पारनेर (प्रतिनिधी) – सध्या उन्हाळाची तीव्रता वाढत असल्याने अन्न व पाणी नसल्यामुळे चिमणीसह अनेक पक्षी अन्न, पाण्यासाठी भटकंती करत असतात. त्यांच्यासाठी आपल्या घरावर दररोज मूठभर धान्य व भांड्यात पाणी हे अभियान राबविण्यात येणार असून याचा प्रारंभ रविवारी जगप्रसिद्ध लवणस्तंभ असणाऱ्या वडगाव दर्या येथील परिसरात केला जाणार असल्याची माहिती आडवाटेचे पारनेरचे प्रमुख प्रा. तुषार ठुबे, माजी सैनिक हरी व्यवहारे, सचिन गायखे, अशोक गायकवाड, महाबली मिसाळ, सोमनाथ चौधरी यांनी दिली.
राज्यात सध्या उष्णता मोठ्या प्रमाणावर आहे. पारनेर तालुक्यासह अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. अनेक ठिकाणी पाझर तलावासह पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे आडवाटेच पारनेर टीमच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारे मूठभर धान्य, भांड्यात पाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
यासाठी आडवाटेचे पारनेरचे कार्यकर्ते राज्यातील ज्या गावात, शहरात असतील त्या ठिकाणी जनजागृती करून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रा.संकेत ठाणगे, राजू ठुबे, प्रमोद चेमटे, पंकज न-हे, आनंदा झावरे, रितिका ठुबे, श्रद्धा थोरात, सपना ठाणगे, सानिका घोडके, वैभव गंधरे यांच्यासह युवकांनी केले आहे.
आपल्या घराच्या छतावर, वरच्या मजल्यावर किंवा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी मूठभर धान्य व पिण्याच्या पाण्यासाठी भांड्यात पाणी ठेवावे, असे नियोजन प्रत्येक घरांवर करावे. हे सांगण्यासाठी आडवाटेचं पारनेर युवक, युवती जनजागृती करणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी छोटा आहे पण पक्ष्यांचे जीवन वाचवण्यासाठी मोठा आहे. – प्रा. तुषार ठुबे, प्रमुख आडवाटेचे, पारनेर.
वडगाव दर्या येथील लवणस्तंभ जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. येथे माकडांची संख्या मोठी आहे. येथील माकडांसाठी धान्य, फळे अनेक दानशूर दरवर्षी देत असतात. देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सुविधा पुरवल्या जातात. आडवाटेच पारनेरचा मूठभर धान्य, भांड्यात पाणी हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत. – सुभाष परांडे, अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती, वडगाव दर्या