मॉस्को – रशियाची राजधानी मॉस्को येथे काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ११ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मॉस्कोमधील एका संगीत समारंभामध्ये ४ सशस्त्र दहशतवाद्यांनी घुसून बेछुट गोळीबार केला होता. या भीषण दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या आता ९३ पर्यंत पोचली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरीटी सर्व्हिसच्या प्रमुखांनी अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना आज याबाबतची माहीती दिली.
दहशतवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या ९३ नागरिकांमध्ये ३ लहान मुलांचाही समावेश आहे. मॉस्कोच्या पाश्चिमेकडील क्रोस्कनोगोर्स्कमधील क्रोकस सिटी शॉपिंग मॉलच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या संगीताच्या कार्यक्रमाच्यावेळी चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हा हल्ला झाला तेंव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी ६ हजार प्रेक्षक उपस्थित होते.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी पाचव्यांदा रशियाचे अध्यक्षपद मिळवल्याच्या काही दिवसांनंतर काही दिवसातच हा दहशतवादी हल्ला झाला. युक्रेनविरुद्धच्या युद्धाचे तिसरे वर्ष सुरू झाले असताना रशियामध्ये झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. रशियातील सरकारी माध्यमांनी या हल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन प्रसिद्ध केले आहेत.
गर्दीमध्ये घुसलेले दहशतवादी अगदी जवळून गर्दीवर बेछुट गोळीबार करत असल्याचे यामध्ये दिसते आहे. रशियातील प्रसिद्ध वाद्यवृंद पिकनिकच्या सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक सभागृहाच्या छतावरही गर्दी करून बसले होते. पहाटेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात हे प्रेक्षक छतावरून खाली पडले होते. सुमारे २ तास हल्लेखोरांचा हा भीषण गोळीबार सुरू होता.
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ११ जणांपैकी चौघेजण थेट हल्ल्यामध्ये सहभागी होते, असे रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इस्लामिक स्टेट – खोरसान या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संगीताच्या कार्यक्रमाच्यावेळी खूप जास्त संख्येने ख्रिश्चनांना लक्ष्य केल्याचे या संघटनेशी संबंधित सोशल मीडिया हॅन्डलवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मात्र त्याची सत्यता पडताळून बघितली जाऊ शकलेली नाही. मात्र क्रेमलिन आणि रशियाच्या सुरक्षा व्यवस्थेने या हल्ल्याबद्दल कोणत्याही दहशतवादी संघटनेला जबाबदार धरलेले नाही. हा हल्ला इस्लामिक स्टेटनेच केला असल्याची माहीती अमेरिकेच्या गुप्तचरांनी दिली आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटना मॉस्कोमध्ये हल्ल्याची योजना आखत असल्याची माहीती अलिकडच्या काळात मिळाली होती.
ही गोपनीय माहीती अमेरिकेच्या गुप्तचरांनी यामहिन्याच्या सुरुवातीला गुपचूप रशियाच्या अधिकाऱ्यांना पुरवली होती, असे अमेरिकेच्या गुप्तचर संंस्थेने म्हटले आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव या माहीतीचा उगम आणि गुप्तचरांच्या स्रोतांबद्दल उघडपणे वाच्यता केली गेली नसल्याचे अमेरिकेच्या गुप्तचरांनी म्हटले आहे. हा इशारा म्हणजे रशियाला धमकावण्याचा प्रयत्न असल्याचे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी म्हटले आहे.
हल्ल्यात मरण पावलेल्यांना आदरांजली आणि जखमींवरील उपचाराला मदत म्हणून शनिवारी सकाळपासून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान करायला सुरुवात केले आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये रशियाच्या प्रवासी विमानात बॉम्बचा स्फोट घडवून आणला आणि विमान पाडले होते. यामध्ये २२४ प्रवासी ठार झाले होते. यातील बहुसंख्य प्रवासी रशियाचे होते आणि सुटी घालवण्यासाठी इजिप्तला जात होते.
सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेल्या इस्लामिक स्टेटने यापूर्वी रशियातील कॉकेकस भागातही अशा प्रकारचे हल्ले केले होते. या संघटनेमध्ये पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचे सदस्य असलेल्या देशांमधून युवकांना भरती करून घेतले गेलेले असते.
आंतरराष्ट्रीय पातळीवरून हल्ल्याचा निषेध
मॉस्कोमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून निषेध केला जातो आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या हल्ल्याचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टनिओ गुटरेस यांनी शक्य तितक्या तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे.