वॉशिंग्टन : अंतराळामध्ये पृथ्वी व्यतिरिक्त इतर कोठे जीवसृष्टी आहे का? याबाबत नेहमीच संशोधकांना उत्सुकता असते. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या युरोपा या चंद्रावर ऑक्सिजनचे प्रमाण असल्याचे काही वर्षांपूर्वी लक्षात आल्यामुळे या चंद्रावर जीवसृष्टी असावी, अशी एक शक्यता व्यक्त होत होती.
पण आता नासाच्या संशोधकांना मिळालेल्या नव्या माहितीप्रमाणे, युरोपा या चंद्रावर पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होत नसल्याने तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता खूपच कमी आहे. नासाचे जुनो हे अंतरिक्ष यान गुरु ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत आहे. या अंतरिक्ष यानाने युरोपा चंद्राबाबत जी माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्याबाबतचा लेख ‘नेचर एस्ट्रॉनॉमि या सायन्स जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यामध्ये या चंद्रावर ऑक्सिजनची निर्मिती होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने तिथे जीवसृष्टी असण्याची किंवा जीवसृष्टी विकसित होण्याची शक्यता कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. युरोपा चंद्रावर जरी हायड्रोजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली तरी ऑक्सिजनची निर्मिती मात्र प्रति सेकंद फक्त 18 किलो होत आहे.
वास्तविक, जीवसृष्टी असण्यासाठी किंवा जीवनसृष्टी विकसित होण्यासाठी प्रतिसेकंद किमान 1000 किलो ऑक्सिजन निर्मिती आवश्यक असते. त्याचमुळे पूर्वी युरोपा चंद्रावर जीवसृष्टी असण्याबाबत जी अशा व्यक्त करण्यात येत होती. त्याबाबत आता नकारात्मक निष्कर्ष समोर येत आहेत.
अर्थात युरोपा चंद्राच्या पृष्ठभागावर काही ठिकाणी आणि पृष्ठभागाच्या खाली सुद्धा पाणी असल्याचा निष्कर्ष मात्र संशोधकांनी कायम ठेवला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, युरोपात चंद्रावर सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात नसल्याने जीवसृष्टी विकसित होण्यासाठी एक अडथळा समोर आला आहे. अर्थात युरोपा चंद्रावर पाणी असल्याने आगामी कालावधीमध्ये सुद्धा संशोधन चालू ठेवण्याचा निर्णय नासाने घेतला आहे.