French Open Badminton 2024 (पॅरिस):- सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ( Satwik-Chirag ) यांनी आणखी एक संस्मरणीय खेळी करत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकले. या भारतीय जोडीने अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या ली झे-हुई आणि यांग पो-ह्सुआन यांच्यावर सरळ गेममध्ये पराभूत करत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा मुकुट पटकाविला.
पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत सात्विक-चिरागने ली आणि यांग यांचा 36 मिनिटांत 21-11, 21-17 असा पराभव करून सुपर 750 स्पर्धेचे विजेतेपद पुन्हा मिळवले.
भारतीय जोडीने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत एकतर्फी विजय मिळवला. सात्विक आणि चिराग यांनी सामन्यातील पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-11 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये दोघांना निश्चितच थोडा संघर्ष करावा लागला.
चायनीज तैपेईच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये दमदार कामगिरी केली आणि एका क्षणी 11-10 अशी आघाडी घेतली. पण सात्विक आणि चिरागने अजिबात हार न मानता आपला खरा खेळ दाखवत शानदार पुनरागमन करत 21-17 असा गेम जिंकला.
फ्रेंच ओपनमध्ये दुसऱ्यांदा यश…
सात्विक आणि चिराग यांना फ्रेंच ओपनमध्ये यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी या भारतीय जोडीने 2022 मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते, तर 2019 मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. दरम्यान, या हंगामात मलेशिया सुपर 1000, इंडिया सुपर 750 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.