नवी दिल्ली – इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य ७ जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकाऱ् यांनी सांगितले.
शुक्रवारी पश्चिम सुमात्रा प्रांतात पेसिसिर सेलातन जिल्ह्यातल्या गावात डोंगर उतारावरून पूराच्या पाण्याबरोबर माती, दगड आणि भल्या मोठ्या शिळा नदीमध्ये कोसळल्या. यामुळे नदीला अचानक मोठा पूर आला. या पूराच्या पाण्यामध्ये काही गावकरी वाहून गेले. गावकर् यांनी ७ जणांचे मृतदेह शनिवारी बाहेर काढले. शेजारच्या दोन गावांमध्ये नदीच्या पात्रातून आणखीन तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे स्थानिक आपत्ती निवारण अधिकार् यांनी सांगितले.
शेजारच्या जिल्ह्यातल्या नदी पात्रातून आणखीन ९ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामुळे मरण पावणार् यांची एकूण संख्या १९ झाली आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने आज सांगितले. पूरामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. तर अन्य ७ जणांचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
अचानक आलेल्या या पूरामुळे किमान ८ हजार जणांना सरकारी छावण्यांमध्ये तात्पुरता आश्रय घ्यावा लागला आहे. दरडी कोसळल्याने आणि पूराच्या पाण्यात १४ घरे पूर्णपणे बुडाली आहेत. तर ९ जिल्ह्यांमधील सुमारे २० हजार घरांचेमोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने मोठ्या भूभागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्त्यांवर चिखल आणि दगड, मातीचे मोठे ढिगारे साचल्यामुळे वाहतूक देखील खंडीत झाली आहे.