आळेफाटा, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील आळेफाटा हे स्वतंत्र असे महसुली गाव आहे. महाराष्ट्र शासनाने हेच महसुली गाव चाळकवाडी या नवनिर्मित तलाठी सजाला जोडल्यामुळे वडगाव आनंद ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव आनंद, पादिरवाडी व आळेफाटा या ठिकाणाचे ग्रामस्थांनी मंत्रालयात धाव घेतली आहे.
सुरुवातीपासून आळेफाटा हे गाव, वाडी विभाजनापूर्वीपासून वडगाव आनंद याच गावात समाविष्ट होते व आहे. एवढेच नाही तर बर्यांच अंशी शेतकर्यांची शेतजमिनी या तीनही गावात असून या गावासाठी असणारे तलाठी कार्यालय हे गेली अनेक वर्षे वडगाव आनंद याच ठिकाणी होते व बळीराजाला ते सुखकर देखील होते व आहे,
परंतु कोणतीही आवश्यकता नसताना आळेफाटा हे महसुली गाव चाळकवाडी या नवीन तयार करण्यात आलेल्या तलाठी सजाला जोडण्यात आले. दरम्यान, जुन्या सजासाठी आमदार अतुल बेनके यांच्या सहकार्याने तहसील कार्यालय, जुन्नर, उपविभागीय अधिकारी, मंचर, जिल्हाधिकारी पुणे व विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे या सर्व कार्यालयांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयी सादर करत यावर विभागीय आयुक्त कार्यालयाचा स्पष्ट अहवाल मंत्रालयी सादर केला आहे.
लोकसंख्या व महसुली क्षेत्रफळाचा विचार केला तर आळेफाटा गाव चाळकवाडी गावात जोडण्याची कोणतीही गरज नसल्याबाबत वडगाव आनंद ग्रामपंचायत यांनी ग्रामसभेचा ठराव देखील पारित करून या प्रकरणाला जोडला आहे. आता हे प्रकरण मंत्रालयात विचाराधीन असून आळेफाटा येथील नागरिक आपले असणारे तलाठी सजा कार्यालय वडगाव आनंद या मूळ सजाला जोडण्यासाठी आग्रही आहेत.
याकामी सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच ऋषिकेश गडगे, सदस्य गणेश भुजबळ, प्रफुल इथापे, संतोष पादिर, संदीप गडगे, गोरख देवकर, सोमनाथ गडगे, तसेच सदस्या वंदना शिंदे, वैशाली देवकर, अल्पना देवकर, कल्पना पादिर, निशा वाळुंज, शोभा शिंदे, अर्चना काशिकेदार, अश्विनी चौगुले ही कार्यकारिणी काम करीत आहेत.
शासकीय नियम पायदळी?
नवीन सजाची निर्मिती करताना वडगाव आनंद ग्रामपंचायतीला कार्यालयाला विश्वासात घेऊन अधिसूचना प्रसारित करून नागरिकांच्या हरकती घेणे गरजेचे होते, ग्रामसभेत विषय चर्चेला येणे अपेक्षित होते, अधिसूचना तीनवेळा प्रसारित अथवा जारी होणे शासकीय नियमाने बंधनकारक आहे, असे काहीही न होता संपूर्ण गावाची फसवणूक झाली आहे. त्यासाठी न्याय मागणीसाठी व आळेफाटा या गावचे तलाठी सजा पुन्हा वडगाव आनंद या सजेत राहण्यासाठी तीनही गावे प्रयत्नशील आहेत.