किवळे,(वार्ताहर) – देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विकासनगर येथे पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 6) मध्यरात्री घडली.
विशाल विजय थोरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास विशाल थोरी याच्यावर चार ते पाच तरुणांनी हल्ला केला.
विशाल याच्या तोंडावर कुंडी, सिमेंटचा गट्टू आणि लाकडी बांबूने मारहाण करून त्यास ठार मारले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील चार जणांना ताब्यात घेतले आहे.
हा खून पूर्ववैमनरस्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.