पुणे – धानोरी येथे टेम्पो सापडलेल्या संशयित ३४० किलो ड्रग्ज पावडरसंदर्भात अनेक मोठ्या “लिंक’ हाती येण्याचा अंदाज आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात सुडो एफेड्राइन नावाची ही पावडर असल्याचे समजते.
ही पावडर कफ सिरप तयार करण्यासाठी वापरण्यात येते.
तसेच त्याच्यापासून क्रिस्टल मेथ नावाचे उच्चप्रतीचे ड्रगही बनवले जाते. ही पावडर नऊ गोण्यांमध्ये भरलेली होती. फॉरेंन्सिक रिपोर्ट आल्यानंतर हे मेफेड्रोन आहे का? या बद्दल आम्हाला सांगता येईल. मात्र, हा माल कुरकुंभ येथे संबंधित कंपनीत पाठवण्यात येणार होता. यामुळे त्याचा वापर ड्रग निर्मीतीसाठी होणार होता हे उघड आहे.
हैदर म्हणतो, “मी तर छोटा प्यादा’
पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली येथे छापे टाकून मेफेड्रोन तस्करी उघडकीस आणली. यात पोलिसांनी तब्बल ३,७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. भैरवननगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, पिंपरी-चिंचवड), युवराज बभ्रुवान भुजबळ (वय ४१, रा. गरिबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम), दिवेश भुतिया (वय ३९), संदीप कुमार (वय ४२, दोघे रा. दिल्ली), आयुब अकबर मकानदार (रा. सांगली) यांना अटक करण्यात आली.
अमली पदार्थ तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे तपासात उघडकीस आले. पुणे शहरातील मालाची साठवणूक आणि वितरणाची सर्व जबाबदारी हैदरवर असल्याचे उघड झाले आहे. तो संदीप धुनियाच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही स्पष्ट झाले. मात्र हैदर स्वत:ला खूप छोटा प्यादा असल्याचे सांगत आहे. त्याच्या मते धुनियाच्या रॅकेटमध्ये इतर चार ते पाच मोठे प्यादे आहेत.
प्रेयसीच्या घराची झडती
दरम्यान, गुन्हे शाखेने हैदर शेखच्या घराची झाडाझडती घेतली आहे. तर, धुनियाने त्याच्या प्रेयसीच्या नावानेही विश्रांतवाडी परिसरात एक रूम घेतल्याचे उघड झाले आहे. तेथेही झाडाझडती घेण्यात येत आहे. यातून महत्त्वाचे दुवे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
“आरोपी सर्व ड्रग्ज एकाच ठिकाणी न ठेवण्याची काळजी घेत होते. ते काही माल गोडाउन, तर काही माल वाहनात ठेवत होते. तर, सांगली येथील गोडाउनमधून माल दिल्ली, गोवा आणि बंगळुरू येथे जात होता. त्या दृष्टीनेही तपास केला जात आहे. त्यांनी आणखी कोठे माल ठेवला आहे का? याची झाडाझडती घेतली जात आहे.” – शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)