पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सिंहगड रस्त्यावरील दांडेकरपूल आणि संगमवाडी येथील स्वर्गीय बिंदू माधव ठाकरे चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या दोन्ही चौकात भुयारी मार्ग उभारायचा की उड्डाणपूल याचा अभ्यास तसेच प्रकल्प आराखडा करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीत नेमण्यात आला आहे. शहरात नवीन उड्डाणपुलांच्या उभारणीसाठी २०२३-२४ च्या अंदाजपत्रता सुमारे ४० कोटी रूपये निधीची तरतूद आहे. या निधीतून हे काम केले जाणार आहे. यासाठी महापालिकेस आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील सर्वात कमी दराची निविदा मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे.
उड्डाणपूल की भुयारी मार्ग…
सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल हा महत्वाचा चौक आहे. स्वारगेटकडून आल्यानंतर सिंहगड रस्ता तसेच शास्त्री रस्त्याने पुढे कोथरूड तसेच शिवाजीनगरकडे जाण्यासाठी या चौकातून वाहने जातात. मात्र, या ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यातच, या रस्त्याला एक रस्ता आंबील ओढयावर पूल बांधून जोडलेला आहे. त्यामुळे या चौकात पूल बांधायचा की स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाण्यासाठी थेट भुयारी मार्ग बांधायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे.
संगमवाडी रस्त्यावरील ठाकरे चौक हा महत्वाचा चौक असून डेक्कन महाविद्याकडून नगररस्त्याकडे येणारी तसेच संगमवाडीकडून विश्रांतवाडी, नगर रस्ता, तसेच पुढे विमानतळाकडे जाणारी वाहने या चौकात येतात. या चौकात वाहनांची संख्या असल्याने दररोज वर्दळीच्या वेळी वाहनांच्या रांंगा लागतात. ही बाब लक्षात घेऊन या चौकात उड्डाणपूल उभारयाचा की भुयारी मार्ग याबाबत अंतीम निर्णय सर्वेक्षणानंतरच घेतला जाणार आहे.
राज्यशासन देणार निधी ?
महापालिकेकडून या दोन्ही चौकातील कोंडी फोडण्यासाठी आराखडा केला जाणार असला तरी निधी मात्र शासनाकडून मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेस २१०० कोटींचा निधी वाहतूक कोंडी फोडण्याची देण्याचे सूतेवाच केले होते तसेच त्यासाठी महापालिकेने प्रस्तावही सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. यात पालिकेने या दोन प्रकल्पांचा समावेश केला आहे.