Adani group to manufacture missile – अदानी समुहाने संरक्षण उत्पादन क्षेत्रात काम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कानपूर जवळ पाचशे हेक्टर जागेवर या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून येथून लवकरच दारुगोळा आणि क्षेपणास्त्राची निर्मिती होणार आहे.
हा कारखाना दक्षिण आशियातील सर्वात मोठा कारखाना असणार असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे. प्राप्त माहितीनुसार या दोन प्रकल्पांमध्ये तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या क्षेत्रातील निर्मिती बरोबरच यात संशोधन आणि विकास करण्यातही पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकल्पाचे उद्घाटन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या दारूगोळा क्षेत्राच्या गरजेच्या 25 टक्के दारूगोळा या प्रकल्पात निर्माण होणार आहे. आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, हा प्रकल्प उभारणे हा भारताच्या दृष्टिकोनातून अभिमानाचा क्षण आहे.
या क्षेत्रात आपण स्वावलंबी होणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात जगात अनेक देशादरम्यान मतभेद निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला आवश्यक असलेला दारूगोळा आणि इतर संरक्षण साहित्य आपल्या देशातच उपलब्ध होण्याची जास्त आवश्यकता असते असे त्यांनी सांगितले.
अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष राजवंशी यांनी सांगितले की, तीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष चार हजार रोजगार निर्माण होणार आहेत, त्याचबरोबर या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात छोटे उद्योग निर्माण होणार आहेत. या प्रकल्पाची घोषणा 2022 मध्ये करण्यात आली होती. दोन वर्षाच्या आतच हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.