कोळकी, (प्रतिनिधी) – संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार फलटण मराठा क्रांती मोर्चाने तालुक्यातील विविध ठिकाणी रस्ता रोको करत राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवार्गातून आरक्षण देण्याची मागणी केली.
या रास्ता रोकोने तब्बल चार ते पाच किलोमीटरवर वाहनांच्या रंगाचा रांगा लागल्या होत्या. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व कारवाईनंतर सोडून देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत हा रस्ता रोको पार पडला.
आज शनिवार (दि.24) रोजी फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील चिंचबन येथे पुसेगाव व सातारा तसेच बाह्य मार्ग असलेल्या पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. बारामती मार्गावर सांगवी पूल येथे सांगवी, सोमंथळी, अलगुडेवाडी, सोनगाव, सस्तेवाडी, येथील बांधवानी रास्ता रोको करत बारामती मार्ग ठप्प केला होता, खुंटे येथील पूलावर खुंटे, शिंदेवाडी, चौधरवाडी, गारपिरवाडी, येथील बांधवानी मार्ग रोखून धरला. होळ येथील मार्गवर होळ, जिंती, फडतरवाडी, भिलकटी, येथील बांधवानी मार्ग रोखीत एक मराठा कोटी मराठा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
फलटण लोणंद मार्गावर बडेखान येथे सुरवडी, साखरवाडी, काळज, निंभोरे, वडजल, काशीदवाडी, ढवळेवाडी, संगमनगर(नांदल) येथील तरुणांनी मार्ग रोखला. हा मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, सातारा व पुणे या मार्गावर निरा पूल,जुना टोलनाका येथे लोणंद, पाडेगाव, तरडगाव, सालपे, तांबवे, चव्हाणवाडी, येथील मराठा बांधवानी रास्ता रोको केला. त्यामुळे तब्बल दोन किलोमीटरवर वाहने उभी असल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
फलटण आसू रस्त्यावर राजाळे येथे राजाळे,साठे फाटा, मठाचीवाडी, सरडे, धुळदेव येथील मराठा समाजाने मार्ग रोखून धरला होता. तसेच गोखळी पाटी येथे बारामती तसेच इंदापूरकडे जाणारा मार्ग ढवळेवाडी, पवारवाडी, तामखडा, हणमंतवाडी, गुणवरे मुंजवडी, शिंदेनगर, जाधववाडी (आसू) या बांधवानी रोखून धरत आरक्षणाची मागणी केली.
फलटण शिखर शिंगणापूर मार्गावर सोनवडी बु येथे नाईकबोमवाडी, तिरकवाडी, मिरढे, जावली, कोळकी, येथील मराठा बांधवानी मार्ग रोखला होता, फलटण दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी येथे भाडळी, निरगुडी, गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडा, सासकल येथील मराठा समाजातील बांधवानी रस्ता रोको केला.
फलटण पंढरपूर मार्गावर वाजेगाव निंबळक येथे निंबळक, पिंप्रद, टाकळवाडे, विडणी, माझेरी, राजुरी, बरड, बागेवाडी, शेरेशिंदेवाडी, कुरवली बु,यांनी मार्ग रोखून धरला. मराठा क्रांती मोर्चाने सर्वांना एकत्र करत हा रस्ता रोको यशस्वी केला.