सातारा, (प्रतिनिधी) – जनसामान्यांचे आधारवड व राजकारण, शिक्षण व सहकारातील पितामह माजी खासदार व सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. लक्ष्मणराव पाटील यांची जयंती बँकेचे मुख्य कार्यालयात साजरी झाली.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक व मान्यवर यांनीही स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.
उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, लक्ष्मणराव पाटील निर्भय व निस्वार्थी वृत्तीचे होते. राजकीय वारसा नसलेले सातारा जिल्ह्यातील हे नेतृत्व ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून यशाची शिखरे गाठत दोनदा खासदार झाले. गरजूंना शक्य ती मदत मनापासून करण्याच्या वृत्तीमुळे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. सर्वसामान्यांचा आधारवड अशी त्यांची ख्याती होती.
प्रभाकर घार्गे म्हणाले, तात्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला अतिशय मार्गदर्शक असे आहे. समाजकारणात वावरताना त्यांनी सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या विकासाला प्राधान्य दिले.
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, आबासाहेब वीर, बाळासाहेब देसाई इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजात वेगळा ठसा उमटविला. मा. संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली बँकेचे कामकाज आदर्शवत असून देशपातळीवर उज्वल झाले आहे.