तेहरान (इराण) – इराणच्या सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून जैश-अल- अदी या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि त्याच्या काही साथीदारांचा खात्मा केला आहे. इराणच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेवरून घुसून इराणच्या सैन्य दलांनी ही लष्करी कारवाई केली आहे. इराणमधून प्रकाशित होणार्या सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या एका इंग्रजी वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
इराण आणि पाकिस्तानने काही आठवड्यांपूर्वी एकमेकांच्या हद्दींमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर प्रथमच हा सशस्त्र संघर्ष झाला आहे. जैश-अल-अदीची स्थापना २०१२ मध्ये झाली असून इराणने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
ही संघटना इराणच्या अग्नेयेकडील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात घातपाती कारवाया करत असते. गेल्या दशकभरापासून जैश-अल-अदीने इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक घातपाती हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये इराणमधील पोलीस स्थानकावर केलेल्या हल्ल्यात ११ पोलीस ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-अल-अदीने घेतली होती.
मात्र काही महिन्यांच्या तणावानंतर इराण आणि पाकिस्तानने सीमेवरील सहकार्यात वाढ केली होती. पाक परराष्ट्र मंत्री जलिल अब्बास जिलानी आणि इराणी परराष्ट्र मंत्री हुसैन अमिर-अब्देलाहियान यांनी संयुक्तपणे हा सहकार्य करार घोषित केला होता.
दोन्ही देशांमधील गैरसमज दूर केले जातील, असे जिलानी म्हणाले होते. मात्र त्यानंतर एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागल्यामुळे या सहकार्यातील हवा निघून गेली होती. दोन्ही देशांनी आपापल्या राजूतांना माघारी बोलावले होते.
मात्र गेल्या महिन्यात पुन्हा एकदा समझोता घडवून आणला गेला आणि परत राजदूतांना नियुक्त केले गेले. सीमेवर तणाव कमी करण्याच्या उपाय योजनाही मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र इराणने थेट सीमेच्या आत घुसून दहशतवाद्यांविरोधात कारवाई केल्यामुळे आता पुन्हा दोन्ही देशांमध्ये तणावाची शक्यता निर्माण झाली आहे.