जुन्नर, (वार्ताहर) – जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या अखंड जयगोषात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती शासकीय परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरी करण्यात आली. तर शिवभक्तांच्या गर्दीने दिवसभर शिवनेरी परिसर फुलुन गेला होता.
याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशा बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, तालुका अध्यक्ष गणेश महाबरे संदेश बारवे आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजन्मस्थळी मंत्रिमंडळींच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पाळण्यात बाल शिवाजी राजांची मूर्ती ठेऊन पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. पाळण्याची दोरी हलवून पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर जन्मोत्सवानिमीत्त सर्वांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आले.
प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली. मंत्रिमंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची विधीवत पूजा करून पालखीला खांदा दिला. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून मानवंदना दिली. पोलीस पथकाने बंदूकीच्या फैरींची सलामी दिली. शेकडो शिवभक्तांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी शिवजन्मस्थळ परिसर दुमदमून गेला होता.
बालचमुंनी मिळवली वाहवा
अनेक बालचमू शिवरायांची वेशभूषा करून गडावर आले होते. दुर्गम आदिवासी भागातील मुथाळणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विदयार्थ्यांनी लेझीम खेळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील शिवराज्याभिषेक सोहळा, प्रताप गडावरील पराक्रम, शाहिस्तेखान बोटे छाटली, असे विविध प्रसंग सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
…अन् गडावर गर्दी वाढली
किल्ल्यावरील दरवाजांची फुलांची तोरणे लावून सजावट केली होती.गडाच्या पायथ्यापासून पहिल्या दरवाजापर्यंत एसटी महामंडळाने बससेवा उपलब्ध करून दिली होती. शासकीय कार्यक्रमानंतर भगवे फेटे, टोप्या घातलेले हातात भगवा झेंडा घेतलेल्या शिवभक्तांची गडावर गर्दी वाढू लागली होती. पहाटेपासून राज्याच्या विविध भागात शिवज्योती मार्गस्थ होत होत्या. राज्याच्या विविध भागातून येणार्या शिवभक्तांसाठी विविध समाजसेवी संस्था व संघटनांच्या वतीने पाणी व प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.