मुंबई – राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर जितेंद्र आव्हाड बोलत होते. हे काही फार आश्चर्य वाटतंय असं काही नाही. ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली त्या दिवशी असं काहीतरी होणार हे माहिती होत असं आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. पक्ष आणि चिन्ह (अजित पवारांना) द्यायचं या अटीवरच हे सर्व झालेलं आहे असं देखील सत्ताधाऱ्यांना उद्देशून आव्हाड यावेळी म्हणाले.
ज्या माणसाने हे बाळ जन्माला घातलं त्याला मरणयातना देण्याचं काम यांनी केलं आहे.अजित पवार,सुनील तटकरे यांना मोठं कोणी केलं ? असा सवाल देखील यावेळी आव्हाडांनी उपस्थित केला. यानंतर अध्यक्षांचा निकाल येणार आहे तोही असाच येणार आहे. वाईट या गोष्टीच वाटत कि शरद पवारांनी ज्यांना घडवलं त्यांनी हे केलं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
शिवसेनेसोबत जे झालं तेच राष्ट्रवादीसोबत होतय आता तुमच्या पक्षाचं नाव काय असेल ? चिन्ह काय असेल ? असा सवाल आव्हाड यांना विचारलं असता आमचा नवा पक्ष आणि नवीन चिन्ह शरद पवार असेल असं देखील आव्हाड यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.