Ganpat Gaikwad case : कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. दरम्यान, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे याच्यावर गणपत गायकवाड यांनी गंभीर आरोप केले होते. त्याच्या या आरोपावरून आता सत्ताधारी शिंदे गटातील मंत्री आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या होत्या. उपचारादरम्यान या सहा गोळ्या डाॅक्टरांनी बाहेर काढल्या आहेत. पोलिसांनी आमदार गणपत गायवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. मात्र या अगोदर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याच मुद्यावरून आज देवेंद्र फडणवीसांची शिंदे गटातील ७ मंत्र्यांनी भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांनी गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
गणपती गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीदेखील या मंत्र्यांनी फडणवीसांकडे केली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एकही शब्द ऐकून घेणार नसल्याचे या मंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, “एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत माझे पैसे बुडवले आहेत. मी आमदार निधीतून केलेल्या अनेक कामांचं श्रेय घेण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबरदस्तीने आपल्या नावाचा बोर्ड लावतात. एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारी पोसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली होती. यावरूनच शिंदे गटाचे मंत्री आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.