Abhishek Singh : देशात एकीकडे या महिन्यात बहुप्रतीक्षित, ऐतिहासिक अयोध्येतील राम मंदिर बांधून त्यात रामलल्लाची प्राण प्रतिस्थापना करण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर भाजपाकडून देशातील रामभक्तांसाठी रामलल्लाच्या दर्शनासाठी बससेवेची सुविधा देण्यात आली आहे. याच सुविधेत अशी एक बस आहे जी रामलल्लाच्या दर्शनासाठी मोफत सुरु करण्यात आली आहे. आणि हि बस ज्यांनी सुरु केली यांचीदेखील चर्चा सगळीकडे जोरदारपणे करण्यात येत आहे.
2011 चा IAS अधिकारी अभिषेक सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जौनपूरच्या लोकांसाठी त्यांनी मोफत बससेवा सुरू केली आहे, जी त्यांना रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला घेऊन जाईल. राम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना परत जौनपूरला सोडण्यात येणार आहे. दरम्यान अभिषेक सिंग यांच्या याआणि बाकीच्या गोष्टींवरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात ते उतरणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अभिषेक सिंह हे आपल्या राजीनाम्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, त्यांचा राजीनामा अजूनही स्वीकारण्यात आला नाही. त्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजीनामे, त्यानंतर सनी लिओनसोबतचा म्युझिक अल्बम आणि आता लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत असलेले अभिषेक सिंह कोण आहे हे जाणून घेऊया.
अभिषेक सिंग नोकरीमुळे होते चर्चेत…
अभिषेक सिंग यांनी 2013 मध्ये झाशी येथे जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले आणि 2015 मध्ये त्यांना प्रतिनियुक्ती देऊन तीन वर्षांसाठी दिल्लीला पाठवण्यात आले. हा कालावधी आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आणि त्याच दरम्यान अभिषेक सिंग वैद्यकीय रजेवर गेले. बराच वेळ ते नोकरीवर रुजू न झाल्याने त्यांना १९ मार्च २०२० रोजी त्याची पुन्हा उत्तर प्रदेशला बदली करण्यात आली. तरीही तो बराच वेळ ड्युटीवर रुजू झाला नाही आणि विभागाने त्यांना याचे कारण विचारले असताही त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यानंतर 30 फेब्रुवारी 2022 रोजी ते पुन्हा कामावर हजर झाले.
2022 मध्ये, गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर त्यांचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये ते सरकारी वाहनासमोर उभे असल्याचे दिसले. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले – अहमदाबादमध्ये ड्युटीवर आहे. निवडणूक आयोगाने त्यांचे वर्तन योग्य मानले नाही आणि नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांना निरीक्षक पदावरून काढून टाकले. यानंतर ते उत्तर प्रदेशात परतले, परंतु नियुक्ती विभागाकडे रिपोर्ट न करता आणि कोणालाही न सांगता नोकरीवरून बेपत्ता राहिला.
फेब्रुवारी 2023 मध्ये, अभिषेक सिंग यांना निलंबित करण्यात आले आणि यूपीच्या योगी सरकारने त्यांना निलंबित केले आणि त्यांना महसूल परिषदेशी संलग्न केले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी राजीनामा दिला. नियुक्ती विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंगचा राजीनामा स्वीकारण्यास काही महिने लागू शकतात कारण अभिषेक सिंग ज्याठिकाणी तैनात होते तिथून एनओसी मागवण्यात आली आहे. एनओसी केंद्र सरकारकडे पाठवली जाईल आणि त्यानंतर राजीनामा मंजूर केला जाईल.
आयएएस होण्याची कथाही रंजक
अभिषेक सिंगने 2011 मध्ये UPSC परीक्षा पास केली होती. त्यांची आयएएस अधिकारी बनण्याची कहाणी ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटातील सत्तूसारखीच आहे. जेव्हा अभिषेकची प्रेमात फसवणूक झाली तेव्हा त्याला काहीतरी मोठे करण्याचे वेड लागले आणि तो आयएएस झाला. अभिषेक सांगतो की, मन दुखावल्यानंतर त्याने आत्महत्येचा विचार केला, पण स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. UPSC उत्तीर्ण करून ९४ वा क्रमांक मिळवला. UPSC ची तयारी करत असताना त्यांची भेट दुर्गा शक्ती नागपाल यांच्याशी झाली आणि दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. दुर्गा शक्ती नागपाल सध्या यूपीच्या बांदा जिल्ह्यातील डीएम आहेत.
अभिनवू क्षेत्रात कसे झाले पदार्पण ?
अभिषेक सिंगलाही अभिनयाची खूप आवड होती, त्यामुळे 2020 मध्ये त्याने ग्लॅमरच्या जगात प्रवेश केला. त्याने गायक बी प्राकच्या ‘दिल तोड के’ गाण्यात काम केले. त्यानंतर त्याने जुबिन नौटियाल यांच्या ‘तुझे भूलना तो चाहता’ या अल्बममध्येही काम केले. यानंतर तो नेटफ्लिक्सच्या ‘दिल्ली क्राइम’ या वेब सीरिजच्या सीझन 2 मध्ये दिसला होता. याशिवाय त्याने ‘चार पंधार’ हा लघुपट केला आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये गीतकार जानी आणि गायक हार्डी संधू यांच्या ‘याद आती है’ या गाण्यात त्याने आपली जादू पसरवली. दोन महिन्यांपूर्वी तो सनी लिओनीसोबत ‘थर्ड पार्टी’ गाण्यातही दिसला होता. सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अभिषेक सिंग 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार?
अभिषेक सिंग यांनी जौनपूरच्या राम भक्तांसाठी ‘निषाद रथयात्रा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ७ फेब्रुवारीपासून राम भक्तांना बसेस अयोध्या राम मंदिरात घेऊन जातील आणि रामलल्लाचे दर्शन घेऊन त्यांना जौनपूरला परत आणतील. या बसना निषाद रथ असे नाव देण्यात आले आहे. या भेटीवरून राजकीय परिणामही काढले जात आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी त्यांनी जौनपूरमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले असून मुंबईतील अनेक चित्रपटसृष्टी या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आली होती.
त्यानंतरही ते लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य दिलेले नसून त्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यूपीमधील वृत्तानुसार, अभिषेक सिंग यांना विचारण्यात आले की, ते भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार का? यावर अभिषेक सिंग यांनी उत्तर दिले की, मी अजूनही आयएएस आहे आणि हे पद सांभाळत असताना कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकत नाही.