नागापूर येथे अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मंचर/पारगाव शिंगवे – नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री नागेश्वर मंदिर येथे लावलेल्या कोनशिलेवर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर पट्टी लावून गावात अशांतता निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी समस्त ग्रामस्थ नागापूर यांच्या वतीने पारगाव पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामधून देवदत्त निकम यांच्या बदनामीचा कट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नागापूर येथे नागेश्वर देवस्थान सभा मंडप बांधकामाकरिता तत्कालीन माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याबाबतची कोनशिला मंदिर परिसरात ४ एप्रिल २०१६ रोजी लावली आहे. या कोनशिलेवर असलेले वळसे-पाटील यांच्या दिलीप या नावावर अज्ञात व्यक्तीने १ फेब्रुवारी रोजी दुपारी १च्या सुमारास स्टिकर लावले होते.
याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागापूर ग्रामस्थ आक्रमक झाले असून कोनशिलेवर स्टिकर लावून गावात अशांतता निर्माण होईल. असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले होते. पारगाव पोलिसांना निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे ग्रामीणचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनील शिंदे, नागेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र मस्के, संदीप निकम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पारगाव : पोलिसांना निवेदन देतेवेळी देवदत्त निकम, गणेश यादव, सुनील शिंदे, रामचंद्र मस्के,संदीप निकम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.