पिंपरी – स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची मशाल पेटवण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी असंख्य चटके सोसले. त्यांच्या त्यागाचे, संघर्षाचे फलित म्हणून आज देशातील कोट्यवधी स्त्रियांना ज्ञानमंदिरांचे द्वार खुले आहे, अशा भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी भोसरी विधानसभेतील नागरिकांसाठी पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर सिनेमा गृहात सत्यशोधक चित्रपटाचा स्क्रिनिंग शो आयोजित केला. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील सिनेमाचा आनंद लुटला. या वेळी चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, माजी उपमहापौर विश्रांती पाडळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे, प्रदेश संघटक राहुल पवार, सरचिटणीस मेघराज लोखंडे, शहरसचिव रजनीकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
खासदार कोल्हे म्हणाले, फुले दांपत्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सर्व जाती-धर्माच्या साथीदारांना घेऊन आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जो संघर्ष केला, त्यांचे उपकार बहुजन समाज कधीच विसरणार नाही. बहुजन समाज एकसंघ व्हावा, यासाठी इम्रान शेख व युवक पदाधिका-यांचा पुढाकार असतो. राष्ट्रवादीचे शिव-शाहू-फुले-आंबेडकर पुरोगामी विचार घराघरात नेण्यासाठी ते विविध उपक्रमांतून कार्यरत असतात. हे समाजकार्य युवकांनी अखंड सुरू ठेवावे.
युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, सध्याच्या काळात सत्ताधारी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला जात, पंथ, धर्म अशा भेदभावात अडकवत आहेत. बहुजन समाजावर कळत नकळत जी भेदभावाची झापड निर्माण झाली आहे. ती पुसण्याचे काम सत्यशोधक चित्रपट करत आहे. बहुजन युवक, युवती, महिलांच्या प्रबोधनासाठी आम्ही हा चित्रपट मोफत दाखवला आहे.