सातारा- जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि सोपोर येथे दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कामगिरीबद्दल सातारचे सुपुत्र आणि राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल हृषीकेश अजित वाकनीस यांना प्रजासत्ताकदिनी युद्ध सेवा पदक जाहीर झाले आहे. देशसेवेबद्दल भारतीय संरक्षण दलातील अधिकारी आणि जवानांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवा आणि शौर्यपदके घोषित केली आहेत.
कर्नल वाकनीस यांचे शालेय शिक्षण सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, इयत्ता 11 वी आणि 12 वीचे शिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी सेवा शिक्षण संस्थेत, पदवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले आहे. सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कर्नल वाकनीस यांनी डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अॅकॅडमीत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते लेफ्टनंट कर्नल म्हणून सैन्यदलात रुजू झाले. त्यांनी जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम या राज्यांमध्ये देशेसवा बजावली आहे.
त्यांना कर्नलपदी पदोन्नती मिळाल्यावर जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात त्यांची नियुक्ती झाली. तेथे बारामुल्ला आणि सोपोर या भागात दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवायांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्नल हृषीकेश वाकनीस यांना युद्ध सेवा पदक घोषित केले आहे. कर्नल वाकनीस यांचा या पदकाने लवकरच सन्मान होणार आहे.