नगर – अकोल्याचे तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी पदाचा दुरूपयोग करून अधिकार कक्षेत 8 शिक्षकांच्या स्वत:च्या सहिने तर 27 शिक्षकांच्या तोंडी आदेशाने अशा 35 शिक्षकांच्या एका शाळेतून दुसर्या शाळेत परस्पर बदल्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गटशिक्षकणाधिकार्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपाका ठेवत सेवेतून दूर केले आहे.
गटशिक्षणाअधिकारी जालींदर खताळ यांना सेवेतून दूर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली असून याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी खताळ यांच्याकडे अकोले पंचायत समिती गटशिक्षण विभागाचा ऑगस्ट ते डिसेंबर 2023 या कालावधीत पदभार होता.
या काळात त्यांनी पदाचा दुरूपयोग करत अधिकार कक्षेत 8 शिक्षकांच्या स्वत:च्या सहिने, तसेच 27 शिक्षकांच्या तोंडी आदेशाने अशा 35 शिक्षकांच्या एका शाळेतून दुसर्या शाळेत परस्पर बदल्या केल्या आहेत. या कृतीमुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी खताळ यांच्याकडून जिल्हा सेवा वर्तणुकीचा भंग झाला आहे. यामुळे त्यांना 23 जानेवारीपासून सेवेतून तात्पूर्ते दूर करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली.