सातारा – दिल्ली येथे दि. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला पाटण तालुक्यातील नाव येथील घरकुल लाभार्थी वसंत विठ्ठल विचारे व दगडाबाई वसंत विचारे या दाम्पत्याला निमंत्रण देण्यात आले असून विचारे दाम्पत्य दिल्लीला रवाना झाले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या राज्यातील दहा लाभार्थींची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निवड झाली आहे. नाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विचारे दाम्पत्याचा समावेश आहे. ही निवड राज्य कक्षामार्फत झाली.
सीएसटी रेल्वे स्टेशन येथून दि. २३ रोजी विचारे दाम्पत्य दिल्लीला रवाना झाले आहे. विचारे दाम्पत्याला दि. २७ रोजी पुन्हा सीएसटी स्टेशन मुंबई येथून नाव येथे शासकीय वाहनाने पोहोचवण्यात येणार आहे. या निवडीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे आदींनी विचारे दाम्पत्याचे अभिनंदन केले.