पुणे : आगामी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काॅंग्रेसकडे इच्छूकांनी रांगा लावल्या असून आजी-माजी आमदारांसह रेडीओ जॅकी पर्यंत अनेकांंनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत. शहर काॅग्रेसकडून ७ ते ९ जानेवारी या कालावधीत पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, २० जणांनी अर्ज सादर केले असून त्यात, आजी-माजी आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे माजी शहराध्यक्ष पदाधिकारी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
ही यादी प्रदेश कार्यकारीणीस पाठविली जाणार असून त्यानंतर ती केंद्रीय कार्यरीणीस पाठविली जाणार आहे. मात्र, पक्षाकडून या नावांमधील एकाला संधी दिली जाणार की आयत्या वेळी वेगळयाच नावाला पसंती देऊन पुण्या बाहेरील उमेदवार दिला जाणार हे मात्र पुढील काही महिन्यात स्पष्ट होणार असले तरी पक्षातील अनेक जण आता पासूनच तयारीला लागल्याचे चित्र आहे.
आमदार आणि आरजे तिकिटासाठी रांगेत…
पक्षाकडे करण्यात आलेल्या अर्जांमध्ये विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पक्षाचे प्रदेश कार्यकारीणीवरील अॅड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, संगीता तिवारी, माजी नगरसेवक आबा बागूल, विरेंद्र किराड, दत्ता बहिराट, नरेंद्र व्यवहारे, यशराज पारखी, मुकेश धिवार, राजू कांबळे, मनोज पवार, दिग्विजय जेधे आणि आर. जे संग्राम खोपडे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.