कराड – उलट्या दिशेने आलेल्या दुचाकीवरील तिघांनी एसटी बसचालक अर्जुन आत्माराम पवार (वय 47, रा. तांबवे, ता. कराड) आणि वाहक दयानंद पंढरीनाथ गुरव (रा. सांगवड, ता. पाटण) यांना शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास पादचारी पुलाजवळ मारहाण करून जखमी केले. त्यानंतर दुचाकीवरील तीन जण पसार झाले. जखमी चालक व वाहकास कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड-गमेवाडी एसटी बस (एमएच-06-एस-8063) कराड बसस्थानकातून प्रवासी भरून गमेवाडीकडे निघाली होती. पुणे-बंगळुरू महामार्गावरील पादचारी पुलाजवळच्या सातारा वळण मार्गावरून बस अरुंद रस्त्यावर आली. त्यावेळी समोरून उलट्या दिशेने दुचाकीवरून तीन जण आडवे आले. उलट्या दिशेने येऊनही त्यांनी बसचालक पवार यांना बस मागे घेण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. तोपर्यंत बसच्या मागे सातारच्या दिशेला जाणार्या वाहनांची रांग लागली होती. त्यानंतर दुचाकीवरील तिघांनी पवार यांना बसमधून खाली ओढून मारहाण केली. त्यावेळी वाहक गुरव हे पवार यांना सोडवायला गेले असता, तिघांनी गुरव यांनाही दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दोघे जखमी झाले. त्यांची अवस्था बघून दुचाकीवरील तिघे पसार झाले. तोपर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच डी. पी. जैन कंपनीचे कर्मचारी दस्तगीर आगा आणि महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी चालक व वाहकाला रुग्णवाहिकेतून कृष्णा रुग्णालयात पाठवले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.