ढाका – बांगलादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. मुहम्मद युनुस यांना स्थानिक न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावर करण्यात आलेली ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
दारिद्र्य निर्मूलनाच्या मॉडेलबद्दल डॉ. मुहम्मद युनुस यांना २००६ साली अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. डॉ. युनुस यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेला यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त झाली होती.
डॉ. युनुस यांनी ग्रामीण टेलिकॉम नावाची संस्थाही स्थापन केली आहे. या संस्थेतील डॉ. युनुस यांच्यासह अन्य तिघांवर कंपनीतील कामगारांसाठीचा कामगार कल्याण निधी न उभारल्यामुळे कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
कामगार न्यायालयाने ग्रामीण टेलिकॉम कंपनीचे चेअरमन म्हणून डॉ. युनुस यांना ६ महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त कंपनीतील अन्य तिघा एक्झिक्युटिव्हना देखील ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॉ. युनुस आणि अन्य तिघांवर कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत.
तुरुंगवासाच्या शिक्षेशिवाय या सर्वांना प्रत्येकी २५ हजार टका (२२७.८२ डॉलर) इतका दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखीन १० दिवस त्यांना तुरुंगातच काढावे लागणार आहेत. निकाल सुनावल्यानंतर डॉ. युनुस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लगेच जामीनही मंजूर करण्यात आला आहे.