सातारा – नागपूर येथील महारॅलीसाठी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते बुधवारी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी येथून बसमधून नागपूरकडे रवाना झाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, कोरेगाव वाई, सातारासह सर्व तालुक्यातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. नागपूर येथे काँग्रेसच्या स्थापना दिवसा निमित्त महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्व आजी, माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार वा अन्य लाखो कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे नागपूरकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बसला जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, जावळी तालकाध्यक्ष संदीप माने यांनी काँग्रेसचा झेंडा दाखवून या बस नागपूरकडे पाठवण्यात आल्या. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अल्पना यादव, रजनीताई पवार, प्रताप देशमुख, मालन परळकर आदी पदाधिकारी नागपूरला रवाना झाले.