पुणे – करोनाच्या जेएन-१ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरू नये. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
जेएन-१ या करोनाच्या नवीन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार यासह सर्व विभागांचे अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हा स्तरापासून घेण्यात यावी. हलगर्जीपणा न करता आरोग्य यंत्रणा, विलागीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर आणि महत्त्वाची उपकरणे कार्यरत आहेत, की नाही याची प्रत्यक्ष तपासणी करावी आणि त्याबाबतचे व्हिडिओ तयार करून राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावेत, असे सावंत म्हणाले.
आरोग्य यंत्रणा सज्ज
जेएन-१ व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयितांच्या चाचण्या वाढवाव्यात. त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करावेत. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाला दिले.