US China : अमेरिका चीनसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी तेथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचीही भेट घेतली होती. त्यातच आता अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमन जनरल सीक्यू ब्राउन ज्युनियर आणि त्यांचे चिनी सहकारी जनरल लिऊ झेनिल यांची एक बैठक होणार आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन जेरिल डोर्सी यांनी याविषयी माहिती देताना,”ही बैठक दोन्ही देशांमधील विश्वास वाढवणे, जबाबदार स्पर्धा आणि दोन्ही देशांमधील संवाद मोकळेपणाने करण्याबाबत असणार आहे. 2022 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या तत्कालीन सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती, तेव्हा दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. आता ती कटुता कमी करण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याअंतर्गत वरिष्ठ पातळीवर सातत्याने बैठका सुरू आहेत. मात्र, तरीही दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये विश्वासाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, यूएस काँग्रेसने नुकताच एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये यूएस संरक्षण मंत्रालय पेंटागॉनला जगात कुठेही चीनच्या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण चीन आपल्या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने अमेरिकन सैन्याच्या पुरवठा साखळीवर लक्ष ठेवतो आणि अमेरिकन जहाजांच्या हालचालींवरही लक्ष ठेवतो, असा अमेरिकेचा आरोप आहे.
या बंदीसाठी अमेरिकेने नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन ऍक्ट कायद्यात बदल केला आहे. मात्र, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही त्याची अंमलबजावणी होण्यास सहा महिने लागू शकतात. दरम्यान, चीनने 60 देशांमध्ये 100 हून अधिक बंदरांमध्ये गुंतवणूक केली आहे, जिथे चीनकडे लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आहेत.