भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांचे सहकारी संजय सिंग यांनी WFI निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाही. साक्षी मलिकनंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटला आज शुक्रवारी (२२ डिसेंबर) कॅमेरासमोर अश्रू अनावर झाले..
विनेश फोगट ही कुस्तीपटूंपैकी एक आहे. कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांविरोधात आंदोलनाचे नेतृत्व विनेश फोगाटने केले होते. विरोधानंतर सिंह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पदाचा राजीनामा दिला होता.
कॅमेऱ्यावर रडत रडत विनेश फोगट म्हणाली, ‘आता फार कमी आशा असल्या तरी आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे. कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे हे खेदजनक आहे. आम्ही आमचे दुःख कोणाकडे मांडायचे? आम्ही अजूनही लढत आहोत. आणि राहू”
आंदोलक पैलवानांनी व्यक्त केली निराशा
डब्ल्यूएफआय निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह अध्यक्ष झाल्यानंतर लगेचच मीडियाशी संवाद साधला होता. या वर्षी जानेवारीत ब्रिजभूषण विरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या कुस्तीपटूंनी निवडणुकीच्या निकालावर निराशा व्यक्त केलीये.
15 पैकी 13 जागांवर संजय सिंह पॅनल विजयी
भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या नवीन अध्यक्ष आणि इतर पदांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये संजय सिंह यांच्या पॅनलने 15 पैकी 13 पदांवर विजय मिळवला. संजय सिंग हे माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांचे एकनिष्ठ आणि विशेष मानले जातात. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.