Yumsem Mate Murder : अरुणाचल प्रदेशच्या खोंसा (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते युमसेम माटे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना भारत-म्यानमार सीमेजवळ तिरप जिल्ह्यात घडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. माजी आमदार काही वैयक्तिक कामासाठी गेले असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना म्यानमार सीमेजवळ असलेल्या राहो गावाजवळ दुपारी ३ वाजता घडली. तिरपचे पोलिस अधीक्षक (एसपी) राहुल गुप्ता यांनी याविषयी माहिती देताना, काँग्रेसचे माजी आमदार युमसेम माटे हे त्यांच्या तीन समर्थकांसह काही वैयक्तिक कामानिमित्त गावात गेले होते, त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी अतिरेक्याच्या ओळखीवर भाष्य करण्यास नकार दिला, माटे हे 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या वर्षाच्या सुरुवातीला 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी चांगलांग जिल्ह्यात जिल्हा प्रौढ शिक्षण अधिकारी म्हणून काम केले होते.
युमसेम माटे हे लाजू गावातील राजकारणी होते आणि तिरप जिल्ह्यातील ओल्लो समुदायाचे होते. ते तिरप जिल्ह्यातील खोन्सा पश्चिम येथून अरुणाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी १९९२-९३ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या इटानगर येथील शासकीय महाविद्यालयातून इतिहास विषयात बीए ऑनर्स केले. आपल्या समाजातील पदवीधर होणारे ते पहिले व्यक्ती होते.