‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेता गौरव मोरेला (Gaurav More) मोठी लोकप्रियता मिळाली. विनोदाच्या अचूक टाईमिंगमुळे तो खास करून ओळखला जातो. या कार्यक्रमामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात दिसत नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. गौरवने हास्यजत्रेला रामराम केला का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु यावर गौरवने उत्तर दिले आहे.
गौरव मोरेने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी हास्यजत्रा सोडलेली नाही. सध्या मी कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे. माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. म्हणून दोन ते तीन महिन्यांचा ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. कारण स्किटची तयारी करताना खूप ओढा-ताण होते. माझ्या स्किट्समध्ये तर मारामारीही असते. आधीच दुखापत झाली आहे तिथे अजून ताण येतो. तसंच सिनेमाचंही काम सुरु आहे. त्यात ३० ते ३५ दिवस द्यावे लागणार आहेत. म्हणून मी ब्रेक घेतला आहे.’
‘गौरव मोरेला गर्लफ्रेंड आहे का?’यावरही त्याने उत्तर दिलं. तो हसतच म्हणाला,’नाही गर्लफ्रेंड नाही आणि मी शोधतही नाही. सध्या मला फक्त काम करायचे आहे.’ गौरव लवकरच प्रसाद ओकसोबत एका मराठी सिनेमात दिसणार आहे. तसंच काही दिवसांच्या ब्रेकनंतर तो पुन्हा हास्यजत्रेत परतणार असल्याचे स्पष्ट केले आहे.