Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेतील अक्षम्य चुकीने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी सागर शर्माने सर्वात मोठा खुलासा केला आहे. चौकशी दरम्यान सागरला संसदेबाहेर आत्मदहन करायचे होते,” अशी धक्कादायक माहिती त्याने दिली आहे. सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे दोन लोक सभागृहात घुसले आणि त्यांनी स्मोक बॉम्बने हल्ला केला आणि सभागृहात धूर पसरला.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत सागर शर्माने, “त्याला आत्मदहन करायचे होते. त्यांनी संसदेबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याची योजना आखली होती. मात्र नंतर ही योजना रद्द करण्यात आली. आग लावण्यासाठी जेलसारखा पदार्थ ऑनलाइन खरेदी करण्याची योजना आखण्यात आल्याचेही सागरने पोलिसांच्या विशेष कक्षाला सांगितले आहे. हे जेल शरीरावर लावल्याने आगीपासून स्वतःचा बचाव होतो. मात्र, ऑनलाइन पेमेंट न झाल्यामुळे जेलची खरेदी होऊ शकली नाही आणि मग संसदेबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा बेत मागे पडला,” असा धक्कादायक खुलासा सागरने चौकशीत केले आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घटना घडवण्यासाठी एक-दोन नव्हे तर 7 धुराचे डबे घेऊन आले होते. गुगल सर्च करून आरोपींनी संसद भवनाच्या आजूबाजूचा परिसर शोधला होता. व्हिडीओमधून आजूबाजूच्या परिसराबाबत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्यात संसदेच्या सुरक्षेचे जुने व्हिडिओही आहेत. पोलिसांना पकडता न येण्यासाठी सुरक्षित चॅट्स कशा पद्धतीने केल्या जातात, याची माहितीही गुगल सर्चद्वारे मिळवण्यात आली.
त्यामुळेच या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सिग्नल अॅपवर एकमेकांशी बोलायचे, जेणेकरून त्यांना कोणी पकडू नये,असा त्यांचा हेतू असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींचा खरा हेतू मीडियावर आपला प्रभाव सिद्ध करण्याचा होता, असेही सूत्रांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन सभागृहाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसदेत प्रवेश करण्याची योजना तयार करण्यात आली होती.