कोपरगाव – अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असून, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर आता सर्वांसाठी खुले होणार आहे. संपूर्ण देशभरातील रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण असणार आहे. त्याअनुषंगाने कोपरगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीराम मंदिर उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
यासंदर्भात माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अयोध्येत होणारा श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कोपरगाव शहरात २२ जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
अयोध्येत होणारा श्रीराम मंदिर उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशाचा सर्वात मोठा उत्सव असणार आहे. त्यामुळे कोपरगाव येथे भव्य-दिव्य स्वरुपात आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यानिमित्ताने शहरातील श्रीराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात येणार आहे. २२ जानेवारीला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातील रामभक्त नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.