सोनई – येथील बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, रात्रीच्या वेळी येथील दिवे बंद असल्याने हे बसस्थानक मद्यपींचा अड्डा बनले आहे. अंधाराचा फायदा घेत येथे अनेक प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
बसस्थानकाची येथे स्वतंत्र जागा असून वाहतूक नियंत्रकाचे कार्यालय असताना सुद्धा येथे वाहतूक नियंत्रकाचा पत्ताच नसतो. बसस्थानक आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खासगी गाड्या बसस्थानक आवारातून प्रवासी घेऊन जातात. शनिशिंगणापूर देवस्थान येथून काही अंतरावर असल्याने येथे भाविकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. महामंडळाचे कुठलेच अधिकारी येथे उपस्थित राहत नसल्याने प्रवासी कोणाकडे चौकशी करणार, असा प्रश्न निर्माण होतो.
रात्रीच्या वेळी बसस्थानक जाण्यास कुणीही धजावत नाही, कारण सर्वत्र अंधार पसरलेला असतो. दिवसातून कितीतरी बसेस येतात आणि जातात मात्र एवढे मोठे गाव असून सुद्धा म्हणावे तसे बसस्थानक व तेथील स्वच्छता अजिबात दिसत नाही, सकाळी बसस्थानक परिसराा प्रातविधीसाठी सर्रास वापर केला जातो. त्यामुळे बस स्थानकात प्रवासी कमी आणि बाहेरचे जास्त असतात.
बसस्थानक व परिसरात दिवे लावण्याची तसदी महामंडळाच्या अधिकाऱ्याने घ्यावी. दिवसभर वाहतूक नियंत्रण करणारा अधिकारी कधीतरी उपस्थित राहतो. सदर अधिकारी कायम उपस्थित राहण्याची गरज आहे. महामंडळाने लाखो रुपये खर्च करून येथे बसस्थानक बांधले खरे पण कर्मचाऱ्यांकडून त्याची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने आजही दुरवस्था झाली आहे. नेवासा आगारप्रमुखांनी तातडीने येथील विद्युत पुरवठा सुरू करून बसस्थानक परिसरात दिवे लावण्याची गरज आहे.