पुणे – लोणावळा येथे ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल करण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यानुसार लोणावळ्यापासून 15 कि.मी – टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
आतवन या गावातील वन विभागाच्या आठ हेक्टर जागेमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तर या प्रकल्पासाठी पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्लास स्कायवॉक’ हा प्रकल्प पीएमआरडीएने हाती घ्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी दिल्या होत्या. दरम्यान यासंदर्भात पुन्हा एक बैठक मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित झाली. त्यामध्ये वन खात्याने जागा उपलब्ध करून द्यावी, तर पर्यटन विभागाने प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. प्रकल्पांचे काम पीएमआरडीएने करावे, अशा सूचना पवार यांनी या बैठकीत दिल्या.
याविषयी माहिती देताना पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, लोणावळा येथील ग्लास स्कायवॉकसंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये वनखात्याने जागा उपलब्ध करून द्यावी. तर पर्यटन विभागाने प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असा देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार पीएमआरडीएकडून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार या प्रकल्पात ग्लास स्कायवॉक बरोबरच झिप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, अॅम्फी थिएटर, आदी विविध सुविध उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.