नवी दिल्ली – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दुपारी चार वाजतापर्यंत तेलंगणा वगळता इतर तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. अर्थात याठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल. निवडणूक प्रचारादरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात विविध आश्वासने दिली होती. ती आता पूर्ण होतील अशी अपेक्षा नागरिकांना असून उज्वला योजनेतील कुटुंबांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर मिळू शकतो. नोव्हेंबरमध्ये काही राज्यात घरगुती गॅस 1103 रुपयांना मिळत होता तर उज्वला योजनेतील कार्डधारकांना 400 रुपये सबसीडीसह 703 रुपयांना मिळत होता. दरम्यान आता यावर अजून सबसिडी मिळेल आणि 450 रुपये मोजावे लागतील.
सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत असे होते चार राज्यातील निकाल –
राजस्थान (एकूण जागा 199)- भाजप 115, काॅंग्रेस 70, इतर – 14
मध्यप्रदेश (एकूण जाग 230) -भाजप 166, काॅंग्रेस 63, इतर – 1
छत्तीसगड (90) – भाजप 53, काॅंग्रेस 37, इतर 00
तेलंगणा (119) – भाजप 9, काॅंग्रेस 68, बीआरएस 35, एमआयएम 7, इतर 00
भाजपने कोणत्या राज्यात काय आश्वासने दिली होती –
छत्तीसगडसाठी भाजपचा जाहीरनामा –
*कृषक उन्नती योजना – 3100 रुपये प्रति क्विंटल दराने धान्य खरेदी. प्रत्येक पंचायतीच्या कॅश काउंटरवर संपूर्ण एकरकमी मोबदला.
*महतरी वंदन योजना – विवाहित महिलांना 12,000 रुपये वार्षिक आर्थिक मदत दिली जाईल.
*भरती – एक लाख रिक्त सरकारी पदांवर भरती.
*पीएम आवास योजना – मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 18 लाख लोकांना पीएम आवास योजनेअंतर्गत निधी दिला जाणार आहे.
*तेंदूपत्ता संकलन – या अंतर्गत प्रति बॅग 550 रुपये आणि 4500 रुपयांपर्यंत बोनस दिला जाईल.
*दीनदयाल उपाध्याय कृषी योजना – या योजनेअंतर्गत, भूमिहीन शेतमजुरांना दरवर्षी 10,000 रुपये दिले जातील.
*आयुषमान भारत, स्वस्थ छत्तीसगड – या योजनेअंतर्गत राज्यातील लोकांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत.
*यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा होणार आहेत. CGPSC घोटाळ्याची चौकशी.
*छत्तीसगड उद्योग क्रांती योजना – या अंतर्गत तरुणांना 50 टक्के अनुदानासह बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
*राज्य राजधानी क्षेत्र – रायपूर, नया रायपूर, दुर्ग आणि भिलाई नगरच्या विकासासाठी दिल्ली एनसीआरच्या धर्तीवर राज्य राजधानी क्षेत्र तयार केले जाईल.
*इनोव्हेशन हब – नया रायपूर हे मध्य भारताचे इनोव्हेशन हब असेल. यामुळे 6 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
*राणी दुर्गावती योजना – बीपीएल मुलींच्या जन्मावर दीड लाख रुपयांचे हमी प्रमाणपत्र.
*गरीब कुटुंबातील महिलांना 500 रुपयांत गॅस सिलेंडर देण्यात येईल.
*मासिक प्रवास भत्ता – विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी DBT मधून मासिक प्रवास भत्ता दिला जाईल.
*भ्रष्टाचाराबाबत तक्रार निवारण आणि देखरेखीसाठी वेब पोर्टल.
*एम्सच्या धर्तीवर प्रत्येक विभागात छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स उघडले जाईल आणि आयआयटीच्या धर्तीवर छत्तीसगड *इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रत्येक लोकसभेत उघडली जाईल.
*छत्तीसगडमधील गुंतवणुकीसंदर्भात दरवर्षी जागतिक दर्जाची परिषद आयोजित केली जाईल.
*सरकार तुन्हार दुवार – या अंतर्गत पंचायत स्तरावर दीड लाख बेरोजगारांची भरती केली जाईल.
*शक्तीपीठ प्रकल्प – चार धाम प्रकल्पाच्या धर्तीवर पाच शक्तीपीठांसाठी 1000 किमीचा प्रकल्प.
*छत्तीसगडमधील लोकांना रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला नेण्यात येणार आहे.
मध्यप्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा –
– उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार
– १०० रुपयांत देणार १०० यूनिट्स वीज
– गव्हाला प्रति क्विंटल २७०० रुपये तर तांदळाला प्रति क्विंटल ३१०० रुपये हमीभाव
-आदिवासींच्या विकासासाठी ३ लाख कोटी रुपये खर्च केले जातील
-प्रत्येक विभागात ‘मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ तसेच एम्स रुग्णालयाप्रमाणे ‘मध्य प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ रुग्णालयाची स्थापना
राजस्थानसाठी भाजपचा जाहीरनामा –
– उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार
-मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींना बारावीनंतर मोफत स्कूटी
– 5 वर्षांत अडीच लाख लोकांना सरकारी नोकऱ्या
-नवजात मुलीला 2 लाख रुपयांचा बचत बाँड
-मुलगी सहावीला असताना खात्यात 6 हजार रुपये, नववीत 8 हजार रुपये, दहावीच्या वर्गात 10 हजार रुपये, बारावीच्या वर्गासाठी 14 हजार रुपये, व्यावसायिक अभ्यासासाठी 50 हजार रुपये आणि 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खात्यात 1 लाख रुपये जमा होतील.