Rashtrapati Bhavan – तुम्ही कधी विचार केला आहे का की आता निवडणुका झाल्या तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या शहरात मतदान करतील? राष्ट्रपती मुर्मू दिल्लीतून मतदान करणार आहेत. याचे कारण म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पत्ता आता बदलला आहे. आता त्या राष्ट्रपती भवनात राहतात, त्यामुळे नवीन पत्त्यासह मतदार ओळखपत्र त्यांना देण्यात आले आहे. याआधी मतदार ओळखपत्रावर ओडिशाचा पत्ता होता, त्यामुळे त्या तिथे मतदान करू शकत होत्या. या नवीन मतदार ओळखपत्राची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
President Droupadi Murmu received her Voter ID card from Shri P. Krishnamurthy, Chief Electoral Officer of Delhi, at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/yE2tTXhzq4
— President of India (@rashtrapatibhvn) November 28, 2023
दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी पी कृष्णमूर्ती मंगळवारी (२८ नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात पोहोचले. येथे त्यांनी महामहिम यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांचे नवीन मतदार ओळखपत्र दिले. राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्यासाठी कृष्णमूर्ती राष्ट्रपती भवनात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘यापूर्वी १० नोव्हेंबरला कृष्णमूर्ती राष्ट्रपती भवनात गेले होते जेणेकरून राष्ट्रपती मुर्मू यांच्या मतदार ओळखपत्रातील त्यांचा पत्ता बदलता येईल. आता निवडणूक आयोगाने त्यांचा पत्ता बदलला आहे.’
राष्ट्रपती कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर राष्ट्रपती मुर्मू यांना नवीन मतदार ओळखपत्र देण्याची माहिती दिली. एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी, श्री पी कृष्णमूर्ती यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांचे मतदार ओळखपत्र सुपूर्द केले.’ इतकेच नाही तर कृष्णमूर्ती यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना मतदार ओळखपत्र सुपूर्द केल्याचे फोटोही पोस्ट करण्यात आले होते, ज्यामध्ये ते एका फाईलमध्ये ठेवलेला मतदार ओळखपत्र देत असल्याचे दिसून येते.