मुंबई – राज्यात एकीकडे आरक्षणासारखे मुद्दे चर्चेत आहेत तर दुसरीकडे आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी देखील सुरु आहे. अशात शिंदे गटातील आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचे समजते. आज दिवाळी निमित्त शिंदे गटातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
दिवाळीनिमित्त वर्षा बंगल्यावर अनेक आमदार मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते. सध्या राज्यात सुरु असलेले मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे (Maratha Obc Reservation) वातावरण लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदेंनी आमदारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मराठा ओबीसी आरक्षणावर जपून भाष्य करा.. टोकाची भूमिका देऊ नका असा सल्ला यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्याचे समजते.
यासोबतच आगामी काळात होणाऱ्या लोकसभेभा निवडणुकांची देखील तयारी सुरु करा आपल्याला मोदी सरकार पुन्हा आणायचं आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन काम करा असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितलं आहे.
महाविकास आघाडीचं लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात
लोकसभेसाठी मविआची 44 जागांवर बोलणी पूर्ण झाली असलयाचे समजते. यामध्ये ठाकरे गट 19 ते 21, काँग्रेस 13 ते 15, शरद पवार गट 10 ते 11 जागा लढेल. तर चार जागांवर चर्चेतून निर्णय निघणार असल्याचे समजते.महाविकास आघाडीत दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवल्या आहेत. वंचित आल्यास अकोल्याची जागा दिली जाईल. वंचित न आल्यास जागा काँग्रेसकडे जाईल. हाणकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीत न आल्यास ही जागा पवार गट लढवणार असल्याचं देखील बोललं जात आहे.