pune news – राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) यंदाची दिवाळी चांगलीच गोड झाली असून, दिवाळीच्या मुहुर्तावर सर्व एसटी बस गर्दीने भरून प्रवास करत आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात एसटीच्या पुणे विभागाला चार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास यामुळे दिवाळीमध्ये स्वारगेट, छत्रपती शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. शिक्षण, नोकरीनिमित्त पुण्यात आलेले बहुतांश नागरिक व विद्यार्थी दिवाळीला गावी जातात.
त्यामध्ये शिवाजीनगर येथील मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे शिवाजीनगर येथून जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही पुण्यातून 515 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच स्वारगेट आगारातून सोलापूर, कोल्हापूर आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना अधिक गर्दी असते. यंदा 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपुजन होते. त्यात शनिवार सुट्टी आल्यामुळे शुक्रवारी (दि. 10) पासून गावी जाण्यासाठी सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी लोटली होती.
त्यामध्ये एसटीची चांगलीच कमाई झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदाची कमाई अधिक असून, अजून पुढील आठ दिवसांचे बुकींग फुल आहे. तर गावाहून परत पुण्याल येणाऱ्यांची संख्याही अधिक असल्यामुळे पुढील आठ दिवस सर्व गाड्या भरून येत आहे.
शुक्रवार (दि. 10) पासून पुणे विभागातील सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे 10 नोव्हेंबर एसटीला 1 कोटी 33 लाखांचे उत्पन्न मिळाले. तर दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर 1 कोटी 36 लाखांचे उत्पन्न मिळाले.
लक्ष्मी पुजन झाल्यावर बाहेर फिरायला जाणाऱ्यांची गर्दी अधिक होते. त्यामुळे 12 नोव्हेंबर 1 कोटी 13 लाखांचे उत्पन्न मिळाले असून, दि. 13, 14 आणि परतीच्या प्रवाशांचे बुकींग फुल असल्याचे पुणे एसटी विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आले.