सातारा – प्रकाशाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीला उद्या, दि. 12 पासून सुरुवात होत आहे. अज्ञानाचा अंध:कार दूर करून, ज्ञानाचा दीप उजळवणाऱ्या या उत्सवासाठी सातारकर सज्ज झाले आहेत. अनेक मंदिरांमध्ये आणि इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घरोघरी लावण्यात आलेल्या आकाश कंदिलांनी शहर उजळून गले आहे. अंधारावर प्रकाशाच्या, वाईटावर चांगल्याच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दिवाळीत नवे कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तू, वाहने, फटाके आदींची खरेदी केली जाते. सातारा शहरासह जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवत असतानाही सातारकर दीपोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सगळीकडे चैतन्याचा माहोल असून, शाहूनगरीत खरेदीचा जल्लोष दिसत आहे.
दिवाळीत घरे आकाश कंदील, पणत्यांनी सजवली जातात. या खरेदीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारपेठांमध्ये गर्दी होती. यातून मोठी उलाढाल झाल्याने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शाळांना सुट्ट्या लागल्याने घरोघरी मुलांमध्ये उत्साह आहे. उत्सवासाठी आपापल्या गावी जाणाऱ्यांमुळे रेल्वे आणि बसस्थानकांवर गर्दी होत आहे. या उत्सावाला खऱ्या अर्थाने रविवारपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी (दि. 9) वसुबारस आणि शुक्रवारी (दि. 10) धनत्रयोदशी साजरी करण्यात आली. नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवारी (दि. 12) एकाच दिवशी आले आहे. त्यानंतर सोमवार (दि. 13) सोडून, मंगळवारी (दि. 14) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आणि बुधवारी (दि. 15) भाऊबीज आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त रविवारी दुपारी 1.45 ते 3.10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला वहीपूजनाचा मुहूर्त पहाटे 2.30 ते 5.30, सकाळी 6.45 ते 7.35 आणि 10.55 ते दुपारी 1.45 पर्यंत आहे, अशी माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.
पावसाचा अनुशेष, पाणीटंचाई यामुळे जिल्ह्यात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळीचा तडाखा, अशा अडचणी असतानाही सातारकर एक उमेद मनात ठेवून दीपोत्सव साजरा करण्यास आतुर आहेत. दिवाळीतील पहिल्या अभ्यंग स्नानासाठी उटणे, साबण, लक्ष्मी जोडी, लक्ष्मीची पावले खरेदी करण्यासाठी साताऱ्यात मोती चौकासह विविध बाजारपेठांमध्ये शनिवारी प्रचंड गर्दी दिसून आली. नरकचतुर्दशीला सातारकर खिंडीतील गणपती, कुरणेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी करतात. अनेक ठिकाणी “दिवाळी पहाट’ संगीत मैफिली होतात. त्यामुळे सातारकरांमध्ये चैतन्य आहे.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
लक्ष्मीपूजन (अमावास्या) प्रारंभ दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनंतर श्री लक्ष्मी आणि कुबेर पूजन वेळ – सायंकाळी 6 वा. 07 मिनिटांपासून ते रात्रौ 08 वा. 07 मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यवहारिक मूल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती “श्री’ या संकल्पनेवर आधारित आहे. “श्री’ म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मान सन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे. या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे.