कराड – अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील हनिफ नालसाब शेख (वय 66) यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी सुनावली. याबाबत माहिती अशी, हानिफ शेख याने अल्पवयीन मुलाला घरी बोलावून घेऊन त्याचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पीडित मुलाच्या नातेवाइकांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी होरे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्यावतीने ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले.
पोलिसांनी सादर केलेले पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हानिफ शेखला शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची तरतूद शिक्षेत करण्यात आली आहे. या खटल्यात ऍड. ऐश्वर्या यादव, ऍड. कोमल लाड, ऍड. ऋचा शहा, पोलीस हवालदार एस. व्ही. खिलारे, आर. पी. घोरपडे, सहाय्यक फौजदार मदने यांनी ऍड. शहा यांना सहकार्य केले.