पिंपरी – दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा… पाऊस आला की नागरिकांमध्ये मोठा आनंद असतो. परंतु ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस आल्याने शहरवासीय व शेतकऱ्यांमध्ये तसेच व्यावसायिकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली.
वर्षभर दिवाळी सणाची वाट पाहणारे व्यावसायिक व नागरिक ऐन दिवाळीत धनत्रयोदशीदिवशी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान अचानक गार वारा आणि पाऊस आल्याने नागरिकांची मोठी धांदल उडाली. बहुतांश नागरिक सकाळपासून सुवर्ण पतपेढींमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुवर्ण, चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करत होते. सायंकाळी बहुतांश नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत आले होते. दिवाळीच्या सणाचा आनंद मोठा असल्याने घरातून बाजारपेठेत येताना रेनकोट, छत्री न घेता आल्याने मोठी तारांबळ उडाली.
पदपथावरील व्यावसायिकांची धावपळ
शहरातील बहुतांश पदपथावर दिवा, रांगोळी, कपडे, घर सजावटीचे साहित्य, केरसुणी आदींची विक्री करणारे व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान जोरदार वारा सुटला, आकाशात लाली पसरली होती. वाऱ्यामुळे ढग पुढे जाऊन आपल्याकडे पाऊस येणार नाही असा अंदाज व्यावसायिकांनी बांधला परंतु तो फोल ठरला. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस आल्याने मोठे नुकसान झाले. तर दुकानातील साहित्य झाकून ठेवण्यासाठी कागद आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.
दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण
धनत्रयोदशीनिमित्त महिला मंडळी घरात दिवाळीचा फराळ बनविण्यात मग्न होते. तर लहान मुले दिवसभर फटाके फोडण्यात दंग होते. परंतु आज सकाळपासून हवामानात बदल झाल्याने उकाडा असह्य होत होता. किचनमध्ये दिवाळीच्या फराळ बनविणाऱ्या महिला अक्षरशः घामाने ओल्याचिंब झाल्या होत्या. त्यामुळे आज पाऊस नक्की येणार अशी भावना नागरिकांची होती. अखेर दिवाबत्तीच्या वेळी वरुणराजाने शहरात हजेरी लावून तापमानात थंडावा निर्माण केला.
लहान मुलांच्या आनंदावर विर्जन
दिवाळीमुळे सायंकाळी घराच्या परिसरात लहान मुलींनी रांगोळी काढली होती. घराच्या समोर, तुळशी वृदांवनासमोर दिवे लावले होते. परंतु पावसाने रांगोळी वाहून गेली. दिवे विजून गेले. त्यामुळे लहान मुलींच्या मनात पावसाविषयी मोठी आवड असून देखील ऐन दिवाळीत आल्याने राग आल्याचे पाहिला मिळाले. लहान मुले घरासमोर फटाके उडवत दिवाळीचा आनंद लुटत होते. परंतु सायंकाळी अचानक पाऊस आल्याने लहान मुले, मुलींना फटाके वाजविण्यावर बंधने आल्याने “येरे येरे पावसा तुला देतो पैसा…’ अशी पावसाचे अतुरतेने वाट पाहणारा बालचमू मात्र आज आलेल्या पावसाने नाराज झालेला पाहण्यास मिळाला.