काराड – येथील मुजावर कॉलनीत 25 ऑक्टोबरला पहाटे झालेला स्फोट हा गॅस गळतीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. आज घटनास्थळाच्या पाहणीत व बाधित कुटुंबांशी केलेल्या चर्चेत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांकडून काही गोष्टी लपवल्या जात असून ते दबावाखाली काम करत आहेत. याप्रश्नी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मी लक्षवेधी मांडणार आहे. तसेच या प्रकरणात पोलीस यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे नावही विधान भवनात जाहीर करणार असल्याची माहिती आ. नितेश राणे यांनी दिली.
आ. नितेश राणे यांनी येथील मुजावर कॉलनीत झालेल्या स्पोटाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. नितेश राणे म्हणाले, मुजावर कॉलनीत झालेल्या स्पोटाच्या ठिकाणी मी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. येथील परिस्थिती पाहता हा स्फोट गॅस गळतीचा नसून याठिकाणी दुसराच प्रकार घडला आहे, असे पाहणीतून व तेथील स्थानिकांशी केलेल्या चर्चेतून दिसत आहे. भरवस्तीत एवढा शक्तिशाली स्फोट होतो, हे संशयास्पद व धोकादायक आहे. पोलीस ज्या दिशेने तपास करत आहेत, त्यावर आम्ही समाधानी नाही. या प्रकरणात पोलीस कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत, असेच एकंदरीत दिसून येत आहे. या स्फोटाचा संपूर्ण तपास एटीएसच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी मागणी करणार असून याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, या आधी पाटणच्या जंगलात बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण झाल्याच्या प्रकारची चर्चा आहे. त्यानंतर कराडमध्ये झालेला हा स्फोट पाहता सातारा जिल्ह्यात पीएफआय सारख्या संघटनांचे अस्तित्व असल्याची शंका उपस्थित होते. या विषयात मी लक्ष घातले असून या संपूर्ण प्रकरणाच्या खोलापर्यंत गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मुजावर कॉलनीतील स्फोट, तेथे आम्ही केलेली पाहणी, स्थानिकांशी केलेली चर्चा ही सर्व परिस्थिती आम्ही गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहोत.
तसेच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून ते कोणाच्यातरी दबावाखाली काम करताना दिसत आहेत. पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे गृहमंत्र्यांची देखील बदनामी होण्याची शक्यता आहे. पोलीस कोणत्या राजकीय दबावाखाली काम करताहेत याची माहिती माझ्याकडे आली आहे. या घटनेत राजकीय दबाव, तसेच पोलिसांची संशयास्पद भूमिका या सर्वांची पोलखोल येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून करणार आहे. यावेळी त्या राजकीय नेत्यांची नावे व त्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही नावे जाहीर करणार असल्याचेही आ. राणे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, कराडमध्ये नूकत्याच झालेल्या मोहरम सणानिमित्त जी मिरवणूक निघाली, त्यामध्ये केलेली घोषणाबाजी भयानक स्वरूपाच्या होत्या. अशा घोषणा देऊनही कोणाला साधी कारवाई नोटीस पोलिसांनी काढली नाही. यावर पोलिसांवरील राजकीय दबावाची जाणीव होते. जिल्ह्यातील पोलीस हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देत असून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे या आधी घडलेल्या विविध प्रकारांवरून कळते. हे हिंदुत्ववादी सरकार आहे, कॉंग्रेसचे नाही. त्यामुळे असे कोण पोलीस करत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. सर्वच पोलीस वाईट नाहीत. मात्र, काही पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गृहखाते बदनाम होण्याची भीती आहे. अशा पोलिसांनाही आम्ही सोडणार नाही, असा सज्जड दमही आ. राणे यांनी यावेळी दिला.
नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी प्रयत्न
आ. नितेश राणे यांनी स्फोट घडलेल्या ठिकाणासह नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. तसेच तहसीलदार विजय पवार व पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडून त्यांनी या स्फोटाची व नुकसानीची माहिती घेतली. त्याचबरोबर घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना शासनाच्या कोणत्या योजनेतून नुकसान भरपाई देता येईल, याबाबत तहसीलदारांशी चर्चा केली. तसेच संबंधितांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.