बारामती : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल मतदान पार पडले होते. त्यानंतर आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्याने बारामतीत शरद पवार की अजित पवार गट विजयी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यातच बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीस सुरवात झाली आहे. बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आली आहे. बारामतीमधील दुपारी १२.३० पर्यंत आलेल्या २५ निकालापैकी २४ ग्रामपंचायत अजित पवार गटाला मिळाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार गट यशस्वी ठरला आहे.
25 पैकी 24 ग्रामपंचायतीत अजित पवार गट विजयी
- सायबाचीवाडी
- कोराळे खुर्द
- शिर्सुफळभोंडवेवाडी
- म्हसोबा नगर
- पवई माळ
- आंबी बुद्रुक
- पानसरे वाडी
- गाडीखेल
- जराडवाडी
- करंजे
- कुतवळवाडी
- दंडवाडी
- मगरवाडी
- निंबोडी
- साबळेवाडी
- उंडवडी कप
- काळखैरेवाडी
- चौधरवाडी
- वंजारवाडी
- करंजे पूल
- धुमाळवाडी
- कऱ्हावागज
- मेडद या ठिकाणी अजित पवार गटाने बाजी मारली आहे. तर चांदगुडेवाडी येथे भाजपचा सरपंच विजयी झाले आहे.
बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. तालुक्यातील 1 ग्राम पंचायत बिनविरोध झाली होती. तालुक्यात सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी या ग्राम पंचायतीकडे लागले होते. या ठिकाणी अजित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान होते. त्यात आता अजित पवार गटाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
तर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे.