कराड – दरोडा टाकण्याच्या तयारीत शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात ईदगाह मैदानाच्या रस्त्याकडेला झुडपांच्या आडोशाला काल (दि. 3) रात्री अंधारात लपलेल्या टोळीतील चौघांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. संशयितांकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे, एक लोखंडी टॉमी, मिरची पूड असा एक लाख 71 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परशुराम उर्फ परशा रमेश करवले (वय 23, रा. सोमवार पेठ, कराड), निशिकांत निवास शिंदे (वय 21, रा. रेठरेकर कॉलनी, शनिवार पेठ, कराड), तुषार उर्फ बारक्या सुभाष थोरवडे (वय 23, रा. बुधवार पेठ, कराड) आकाश उदय गाडे (वय 19, रा. बुधवार पेठ, कराड) यांना अटक करण्यात आली असून, एक जण पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरातील ईदगाह मैदानाच्या रस्त्याकडेला झुडपांच्या आडोशाला परशुराम करवले, निशीकांत शिंदे, तुषार उर्फ बारक्या थोरवडे, आकाश गाडे व अन्य एक जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व कर्मचाऱ्यांना कारवाईचा आदेश दिला. या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये देशी बनावटीची तीन पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे, एक टॉमी, अशी शस्त्रे सापडली. संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.