पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या तीन दिवसांत घडलेल्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. आवारात सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदींसाठी परवानगी दिली जाणार नसल्याचे शनिवारी स्पष्ट करण्यात आले.
पूर्वपरवानगीशिवाय अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार असल्याचेही कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले आहे. पुणे विद्यापीठात सुरू असणाऱ्या अशैक्षणिक घटनांमुळे, विद्यापीठाच्या संकुलाची तुलना ही थेट “जेएनयू’मध्ये होणाऱ्या घटनांशी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांच्या घटनांमुळे, विद्यापीठाची प्रतिमा डागाळली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आणि नोंदणी करुनच प्रवेश दिला जात आहे. त्याचप्रमाणे वसतिगृहात केवळ रहिवाशी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे यापूर्वीच नमूद केले आहे.
…तर कारवाई अटळ
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात आंदोलन किंवा काही उपक्रम घ्यायचे असल्यास, विद्यापीठाच्या प्रशासनाची आणि पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. ही परवानगी न घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.