टाकळीभान -अशोक सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन 2023-2024साठी उसाचा भाव पहिला हप्ता 3 हजार रुपये टनाप्रमाणे ऊसउत्पादकांना द्यावा, अशी मागणी उपसरपंच कान्हा खंडागळे व शेतकरी काकासाहेब कोकणे यांनी केली आहे. मागणीप्रमाणे जर अशोक उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा, अशोकचे अध्यक्ष माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी भाव दिल्यास त्यांची ग्रामस्थांतर्फे पेढेतुला करण्यात येईल व हत्तीवरून साखर वाटण्यात येईल, असे खंडागळे व कोकणे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले.
पत्रकात म्हटले आहे की, माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी काटकसरीतून गेली पस्तीस वर्षे सभासदाभिमुख कारभार केलेला आहे. यंदा पाऊस अतिशय कमी झाल्यामुळे शेतातील विहीर, कूपनलिकांची पाणी पातळी कमी झाली असून, पुढील पिके येतील याची शाश्वती नाही, तसेच चालू हंगामात ऊस लागवडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंदा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता 3 हजार रुपये जाहीर केला आहे, म्हणून टाकळीभानमध्ये महसूलमंत्री विखे पाटलांच्या नागरी सत्काराचा फलक ताई प्रतिष्ठाण व ग्रामस्थांतर्फे लावण्यात आला आहे. तोच भाव अशोक कारखान्याने दिल्यास माजी आ. मुरकुटे यांची त्यांच्या वजनाइतकी पेढेतुला करण्यात येईल, असे सांगून उपसरपंच खंडागळे यांनी व कोकणे यांनी हत्तीवरून साखर वाटण्यात येईल, असे म्हटले आहे.
दराबाबत सोशल वॉर
अशोक कारखान्याने तीन हजार रुपये टनाप्रमाणे भाव द्यावा, अशी मागणी येथील तरुण शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर केल्याने ऊसदराबाबत सोशल मीडियावर दिवसभर मोठ्या प्रमाणात सोशल वॉर सुरू होते. त्यात अनेक तरुण शेतकरी सहभागी होऊन ऊसदराबाबत स्पष्ट मत व्यक्त करताना दिसत होते.