शेवगाव – तालुक्यात पार पडणाऱ्या 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 5) होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे, परिविक्षाविधीन तहसीलदार राहुल गुरव यांनी दिली. या वेळी 27 ग्रामपंचायतींच्या थेट जनतेतून होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी 78 उमेदवार निवडणूक लढवित असून, एकूण 94 प्रभागांतील ग्रामपंचायत सदस्यांच्या 243 जागांसाठी 573 उमेदवार उभे आहेत. एकूण मतदाराची संख्या 56 हजार 361 असून, त्यात 29 हजार 732 पुरुष, तसेच 26 हजार 629 महिला मतदारांचा समावेश आहे.
मतदानासाठी 107 मतदान केंद्रे करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई अशा पाच कर्मचाऱ्यांशिवाय काही राखीव अशा एकूण 725 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान साहित्य व कर्मचारी नेण्या-आणण्यासाठी 13 खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
रावतळे कुरुडगाव ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी एक मतदान केंद्र असून, तेथे 242 पुरुष व 231 महिला असे 473 मतदार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक गावात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तहसीलदार प्रशांत सांगडे सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.