रायगड – जिल्ह्यातील महाडच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग “ब्लू जेट’ केमिकल कंपनीत लागली होती, या आगीत 11 कामगार अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कंपनीतील पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याची माहिती आहे. वास्तविक गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि त्या नंतर ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ही केमिकल कंपनी असल्याने आग जास्त भडकली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि महाड प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाड एमआयडीसी मध्ये आहे.
या कंपनीत सकाळी 11 च्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोटानंतर आग भडकली. त्यामुळे कंपनीमध्ये धावपळ सुरु झाली. यात आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरल्याचे प्रत्यक्ष दर्शीनीं सांगितले आहे. दरम्यान, आग लागली त्या वेळी या कंपनीमध्ये 57 कामगार काम करत होते. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.