World Cup 2023 India vs Sri Lanka Match live Score : विश्वचषक 2023 च्या 33व्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यांना चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल. त्याच वेळी, श्रीलंकेसाठी हा ‘करो वा मरो’चा सामना आहे. पराभवामुळे उपांत्य फेरीचा त्याचा मार्ग अत्यंत कठीण होईल. श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची शानदार अर्धशतके आणि रविंद्र जडेजानं शेवटच्या षटकामध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर 50 षटकात 8 गडी गमावून 357 धावा केल्या असून श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं मोठ आव्हान ठेवलं आहे.
358 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. पथुम निसांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बुमराहने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. आता दिमुथ करुणारत्ने आणि कर्णधार कुसल मेंडी यांना मोठी भागीदारी करावी लागणार आहे. त्यानंतरच श्रीलंकेचा संघ सामन्यात टिकून राहील.
#CWC23 #INDvSL : शुभमन-विराट-श्रेयसची शतके हुकली; भारतानं श्रीलंकेविरूध्द उभारली मोठी धावसंख्या…
तत्पूर्वी, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला दिलशान मदुशंकाने क्लीन बोल्ड केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. मधुशंकाने ही भागीदारी तोडली. त्याने शुभमनला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकडे झेलबाद केले. शुभमन 92 चेंडूत 92 धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले.
यानंतर विराटचे शतकही हुकले. मधुशंकाने त्याला निसांकाकरवी झेलबाद केले. विराटने 94 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 88 धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने 46 चेंडूत 60 धावांची शानदार भागीदारी केली. राहुल 19 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले.
सूर्यकुमार यादव काही विशेष करू शकला नाही. तो नऊ चेंडूत 12 धावा करून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकावले. त्याने 36 चेंडूत पन्नास धावा पूर्ण केल्या. मधुशंकाने श्रेयसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो 56 चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 82 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमी दोन धावा करून बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 24 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. भारतीय डावातील शेवटच्या चेंडूवर जडेजा धावबाद झाला.
श्रीलंकेकडून मधुशंकाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्यानं 10 षटकात 80 धावा दिल्या. तर चमीरा यानं 10 षटकात 71 धावा देताना एक विकेट घेतली. भारताचे दोन फलंदाज धावबाद झाले.